‘भारतीय राजकारणाची दिशा व दशा’ यावर विवेकानंद महाविद्यालयात विशेष व्याख्यान संपन्न
- Vivek Aware
- Dec 12, 2019
- 2 min read

आज दिनांक 11 डिसेंबर 2019 रोजी विवेकानंद कला सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद, येथे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ‘भारतीय राजकारणाची दिशा व दशा’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रोफ़ेसर प्रशांत अमृतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये भारतीय राजकारणाची सैद्धांतिक व घटनात्मक चौकट यांची पार्श्वभूमी समजावून दिली. यानंतर 26 जानेवारी 1950 पासून ते आजवरच्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली. यात एकपक्षीय वर्चस्व असणारी बहुपक्षीय व्यवस्था सुरुवातीला राहिली तर 1967 नंतर अनेक राज्यात प्रादेशिक व बिगर काँग्रेस पक्षाची सरकारे अस्तित्वात आल्याने खऱ्या अर्थाने बहुपक्षीय पद्धती अस्तित्वात आली असे म्हटले. मात्र 1998 नंतर देशात पक्षीय राजकारणाऐवजी पक्षांच्या गटाचे राजकारण सुरू झाले. यात काही प्रादेशिक पक्षांनी संतुलकाची भूमिका निभावली तर प्रसंगी सत्तेवर असणाऱ्या आघाडीत सामील झाले. वैचारिक पातळीवर मात्र डावे-उजवे व तटस्थ असे प्रवाह दिसतात. अलीकडील काळात धर्मनिरपेक्षता या तत्वाची अवस्था समाजवादा प्रमाणे झाल्याचे म्हटले. राजकीय पक्षाने मात्र नकारात्मक राजकारणाचा आधार घेतला परंतु विकासात्मक मुद्दे घेऊन जनतेसमोर जाण्याची गरज आहे. राजकारणाला बुद्धीचा नाही तर भावनेचा खेळ बनवण्यात आला आहे. या सर्व परिस्थितीला समाज व प्रसार माध्यमे हे दोन घटक कशा पद्धतीने प्रतिसाद देतात यावर राजकारणाची दिशा व दशा अवलंबून आहे असे प्रतिपादन केले. यात प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडिया यांना राजकीय पक्षांनी अंकित केल्याने तो तटस्थ राहिला नाही. सामाजिक माध्यमांमध्येही राजकीय पक्षांच्या माहिती तंत्रज्ञान सेलच्या माध्यमातुन हस्तक्षेप केला जात आहे. मतदारांना विविध प्रलोभनांद्वारे खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेंव्हा देशात चळवळी निर्माण होण्याची गरज आहे. तरच राजकरणाची दशा व दिशा योग्य रितीने निश्चित होइल.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफ़ेसर शाम शिरसाट होते. त्याबरोबरच कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. आर. शेंगुळे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र शेजुळ यांनी केले. तसेच सुत्र संचालन प्रा. दत्तात्रय लावंड व व्याख्यात्यांचा परिचय डॉ. सत्यपाल कांबळे यांनी केला. शेवटी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. दत्ता येरमुले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यात विभागातील प्राध्यापक प्रा. विवेक आवारे आणि प्रा. नामदेव खंदारे यांनी योगदान दिले तसेच सदर कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
Comments