राज्यशास्त्र विषयाचे महत्व
- Vivek Aware
- Nov 23, 2018
- 2 min read
Updated: Nov 26, 2018

राज्यशास्त्र हा विषय स्पर्धा परीक्षेतील एक लोकप्रिय विषय म्हणून ओळखला जातो. अगदी शिपाई भरती पासून ते जिल्हा अधिकारी पदासाठी घेतल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत या विषयावर प्रश्न विचारले जातात. राज्यशास्त्र हा विषय सोपा असून लवकर आकलन होणारा आहे. यामुळेच अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी देखील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत मुख्य वैकल्पिक विषय म्हणून राज्यशास्त्राची निवड करताना दिसतात. गत वर्षांचा निकाल पाहता लक्षात येते कि राज्यशास्त्र वैकल्पिक विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र या विषयाचे महत्व केवळ स्पर्धा परीक्षेपुरतेच मर्यादित नाही. अलीकडील काळात राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराचे अनेक क्षेत्र खुले झालेले आहे.
राज्य ही मानवी जीवनातील एक प्राचीन संस्था आहे. या राज्य संस्थेचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडत असल्यामुळे पूर्वीपासून तिचा अभ्यास या ज्ञानशाखेत केला जात आहे. थोडक्यात सांगायचे असेल तर राज्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र अशी राज्यशास्त्राची ढोबळपणे व्याख्या केली जाते. अँरिस्टोटल या ग्रीक विचारवंताला राज्यशास्त्राच्या जनक मानले जाते. या ज्ञानशाखेच्या अध्ययनाला प्राचीन काळापासून प्रारंभ झाला असला तरी साधारणपणे सतराव्या अठराव्या शतकात यास खूप महत्व प्राप्त झाले. या ज्ञानशाखेमध्ये राजकीय मूल्य, संस्था, राजकीय प्रक्रिया तथा राजकीय धोरणे यांचा अभ्यास केला जातो याबरोबरच राजकीय सिद्धांत आणि त्यांचे उपयोजन, राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती तसेच राजकीय वर्तनाचे विश्लेषणही केले जाते. व्यक्तीला राजकीय व्यवस्थेची ओळख करून देण्याचे काम या ज्ञानशाखेमध्ये केले जाते.
आधुनिक काळात या ज्ञानशाखेचा फार मोठया प्रमाणावर विस्तार झालेला आहे. या ज्ञानशाखेच्या अनेक उपशाखा आहेत. ज्यामध्ये राजकीय सिद्धांत, राजकीय विचारप्रणाली, तुलनात्मक राजकारण, लोक प्रशासन, आंतरराष्ट्रीय संबंध ई. यांचा समावेश होतो. अलीकडील काळात Psephology (निवडणूकशास्त्र) हि उपशाखा अधिक लोकप्रिय झालेली आहे.
राज्यशास्र विषयातील संधी
राजकीय विश्लेषक म्हणून प्रसार माध्यमातून काम करता येते. यासाठी राजकीय इतिहास आणि राजकीय संकल्पनांचे ज्ञान असावे लागते तसेच सभोवताली घडणाऱ्या राजकिय घडामोडीवर बारीक लक्ष ठेवावे लागते.
आंतरराष्ट्रीय संबंधाचे उत्तम ज्ञान असेल तर संयुक्त राष्ट्रा मध्ये काम करण्याची संधी मिळू शकते https://unjobs.org/themes/political-science/2
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे प्रशासकीय अधिकारी होता येते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये राज्यशास्त्र वैकल्पिक विषय घेऊन यश मिळवणे सोपे जाते.
UGC NET / SET परीक्षा उत्तीर्ण झाल्यास वरिष्ठ महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक म्हणून देखील काम करता येते .
प्रमुख राजकीय पक्षांमध्ये विचार गट (Think tank) म्हणूनही योगदान देता येते. शासन स्तरावर विविध धोरणे ठरवित असतांना शासनकर्त्यांना आर्थिक, सामाजिक तथा विविध क्षेत्रातील अभ्यासकांप्रमाणे राजकीय अभ्यासकांची देखील गरज भासत असते.
विविध NGO, संघटनांमध्ये देखिल संधी मिळू शकते.याव्यतिरिक्त विधि, पत्रकारिता, समाजकार्य ई. अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतांना राज्यशास्त्र विषय उपयुक्त आधार ठरतो.
Comments